।। श्री दत्त प्रसन्न ।।
ह.भ.प.श्री. विवेकबुवा गोखले यांना कीर्तनाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.श्री. नरहरीबुवा गोखले यांचेकडून प्राप्त झाले. श्रीदत्त कृपेने व महद्भाग्याने प.पू.श्री. विद्याशंकर भारती स्वामी महाराज, शंकराचार्य - करवीर पीठ (पूर्वाश्रमीचे ह.भ.प.श्री. रामचंद्रबुवा कऱ्हाडकर) हे गुरू म्हणून लाभले. कीर्तन क्षेत्रामध्ये कऱ्हाडकर पठडी ही साहित्य, तत्वज्ञान, वेदांत, पूर्वरंग-आख्यान व लक्षणीय अश्या गायनकलेसाठी सुप्रसिद्ध आहे. प.पू. शंकराचार्य स्वामींच्याकडे ८ वर्षे गुरुकुल पद्धतीने श्री. विवेकबुवांना कऱ्हाडकर पठडीचे ज्ञान प्राप्त करता आले.
"गुरुशुश्रूषया विद्या..." या न्यायाने श्री. विवेकबुवांनी स्वामी महाराजांचे शागीर्द होऊन अत्यंत परिश्रमाने कीर्तनविद्या ग्रहण केली. प. पू.शंकराचार्य स्वामी महाराज यांचेबरोबरच कै. ह.भ.प.श्री. दत्तदासबुवा घाग (नृसिंहवाडी), वेदमूर्ती श्री. नारायण शास्त्री गोडबोले (जमखिंडी) तसेच कीर्तन क्षेत्रांतील अनेकानेक दिगज्जांचे मार्गदर्शन विवेकबुवांना आजवर लाभले आहे.
"महापुरुष संश्रय: विवेक बुवांना "विद्या-गुरू" म्हणून करवीर पिठाधीश्वर "विद्या शंकर भारती" स्वामींचा ७/८ वर्षे सहवास लाभला...ह्या यतिश्रेष्ठांच्या सहवासात अनेकानेक गुरू परंपरांच्या सिद्ध पुरुषांचा-संतांचा सहवास त्यांना लाभला...सन २००० साली विवेक बुवां गुरू महाराजां बरोबर वाराणसीला गेले तेव्हा श्री गोंदवलेकर महाराजांच्या शिष्य परंपरेतील बेळगांव निवासी सद्गुरु श्री काणे महाराज शिष्य परिवाराशी त्यांचा संबंध जुळून आला...!!!
प.पू. काणे महाराज यांच्या गादीचे उत्तराधिकारी प.पू.सेवानंद महाराज ऊर्फ "श्रींकाका" यांचा सहवास बुवांना लाभला. पुढे २००३ साली राम-नवमीच्या दिवशी, राम नामाची गुरू परंपरा असलेले स्थान असले तरी विवेक बुवांना, व त्यांच्या आई-वडिलांना एकत्रपणे दत्त नामाचाच "अनुग्रह" लाभला...!!!
प.पू. काणे महाराज हे सद्गुरू (मोक्ष-गुरू) म्हणून लाभल्या नंतर सलग १३ वर्षे बुवांनी राम-नवमीच्या उत्सवांत बेळगांव येथे कीर्तन सेवा अर्पण केली. ह्याच गुरू परंपरेतील थोर मार्गदर्शकां कडून विवेक बुवांची पुढील पारमार्थिक वाटचाल सुरू झाली...!!!
२०१५ साली बुवांनी कीर्तनाचे/ प्रवचनांचे कोणतेही कार्यक्रम न करता एक वर्ष श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मुक्काम केला.
या वर्षभरांत बुवांकडून घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे १ लक्ष पाठ, श्री सरस्वती अनुष्ठान, श्री विष्णू सहस्रनाम उपासना तसेच गायत्री पुरश्चरण, इ. उपासना श्री सद्गुरू कृपेने निर्विघ्नपणे पार पडली.
वैयक्तिक उपासने बरोबच समाजामध्येही दत्तभक्ती वाढीस लागावी व श्री दत्तांच्या व सद्गुरूंच्या कृपेचा लाभ समाजात सर्वांनाच घेता यावा यासाठी सद्गुरूंच्या प्रेरणेने श्री दत्त बावन्नी च्या उपासनेचा प्रचार व प्रसार बुवा करीत असतात. दत्तबावन्नी प्रचार / प्रसार व इतर उपक्रमांविषयी...
ह.भ.प.श्री. विवेकबुवा गोखले गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ कीर्तन - प्रवचन सेवा करीत आहेत. महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रात मिळून आजवर २५०० हून अधिक कीर्तन - प्रवचनांची सेवा त्यांनी केली आहे. या सर्व कीर्तन - प्रवचनांनी महाराष्ट्रासह अन्य प्रांतात व परदेशातही विशेष लोकप्रियता संपादित केली आहे. तसेच आजच्या पिढीतील तरुण व चौकस श्रोत्यांचाही एक विशेष श्रोतृवर्ग तयार होतो आहे. विवेक बुवांसारख्या तरुण व कीर्तन सेवेला पूर्णपणे वाहून घेतलेल्या कीर्तनकार - प्रवचनकाराचे हे विशेष यश आहे.
या बरोबरच २०१३ साली दुबई येथे महाराष्ट्र मंडळ - दुबई आयोजित तसेच दासबोध अभ्यास वर्ग - दुबई यांचेकडून नियोजित एका कार्यक्रमात विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री.शंकर अभ्यंकर व सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री. चारुदत्तबुवा आफळे यांच्याबरोबर श्री. विवेकबुवांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात "अध्यात्मातून Time management & stress management" या विषयी श्री. विवेकबुवांचे कीर्तन झाले. पुढे ७ दिवस दुबईतील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचनांचे कार्यक्रमसुद्धा झाले.
प्रवचनाचे विषय
व्याख्यानाचे विषय
वरील विषयांव्यतिरिक्त इतरही अनेक विषयांवरील कीर्तने / व्याख्यान व प्रवचनांसाठी संपर्क
कीर्तन परंपरा कायम राखावी तसेच आपल्या जवळील कीर्तन विद्द्येचा लाभ इतरही अनेक उत्सुक विद्यार्थांना व्हावा याकरिता विवेक बुवा नारदीय पठडीतील कीर्तन वर्ग व शिबिरेही घेतात.